नाशिक : अवघ्या १७ वर्षांचा सायकलपटू ओम महाजन याने काश्मीर ते कन्याकुमारी (के टू के) अंतर ८ दिवस, ७ तास, ३८ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली. काश्मीरमधील श्रीनगरच्या जगप्रसिद्ध लाल चौकातून ओमने १३ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी राइडला सुरुवात केली. ओमने ३९०० किलोमीटर अंतर ८ दिवस ७ तास ३८ मिनिटांत पूर्ण केले.
मुलांनी शाळा व कॉलेजसाठी सायकलचा वापर करावा ‘बी कूल.... पेडल टू स्कूल’ हे स्लोगन घेऊन ही राइड ओमने नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग यांना समर्पित केली. श्रीनगर ते दिल्ली ते झांशी ते नागपूर, हैदराबाद - बंगळुरू - मदुराई ते कन्याकुमारी असा मार्ग होता. सायकलिंग कोच मितेन ठक्कर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. ओमने त्याचे वडील डॉ. हितेंद्र आणि काका डॉ. महेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेऊन ही गरुडझेप घेतली.
रेकॉर्ड पुन्हा नाशिकच्याच नावेकाश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर नाशिकच्या कर्नल भरत पन्नू यांनी ८ दिवस ९ तास ४० मिनिटांत पूर्ण केले होते. त्यानंतर नाशिकचेच रॅम विजेते सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन यांचा चिरंजीव असलेल्या ओमने तेच अंतर ८ दिवस ७ तास ३८ मिनिटे इतक्या कमी वेळेत पूर्ण करून विक्रम पुन्हा नाशिकच्याच नावावर नोंदवला.