नाशिक: सध्या गुजरातच्या निवडणुकांचा बोलबाला आहे. त्यामुळे वेदांता फॉक्सकॉन आणि टाटांचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकच्या 'उडान' सेवेला देखील गुजरात निवडणुकांचाच फटका बसल्याची चर्चा होत आहे. 'अलायन्स एअर'ने विमान सेवा बंद करण्यामागे तेच एक कारण असल्याचे सांगितले जात असून ही सेवा आता गुजरात इंदौर मार्गावर सुरू होणार असल्याची चर्चा सध्या उद्योग क्षेत्रात होत आहे.
नाशिकमधील उद्योग व्यावसायिक हे सातत्याने विकासाची कास धरत आहेत. मुंबई- पुणे- नाशिक हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. त्यात औरंगाबाद जोडून सुवर्ण चतुष्कोन मानला जातो. मात्र, चौकोनातील एक कोन कायम कमकुवत राहिला आहे, अशी नाशिककरांची भावना आहे. नाशिकला अनेक उद्योगपती चौकशी करतात; परंतु प्रकल्प अन्यत्र पळवले जातात. केवळ अन्य जिल्ह्यातच नाही तर अन्य राज्यातही नेले जातात. आता फॉक्सकॉन नाही; पण किमान टाटा एअरबसचा प्रकल्प नाशिकला होण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण होते. एचएएल येथील प्रकल्प सध्या सुरू असला तरी नवीन भरीव काम या ठिकाणी नाही. त्यातच विमानतळदेखील असून त्याचा एअरबससाठी उपयोग होऊ शकतो. मात्र, त्यामुळे नाशिकच्या काही उद्योजकांनी पुढाकार घेतला आणि तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले. त्यांनीही शासनाला पत्र पाठवले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.
एकीकडे उद्योग गुजरातला जात असताना नाशिकच्या विमान सेवेला देखील घरघर लागल्याचे दिसत आहे. एकेक करीत विमान कंपन्यांनी नाशिकची उड्डाणे बंद केली असून आता अलायन्स एअरची दिल्ली अहमदाबाद- नाशिक- पुणे- बेळगाव ही सेवा ३१ ऑक्टोबरपासून कोणत्याही सबळ कारणाशिवाय बंद होत आहे. त्यापूर्वी २३ ऑक्टोबरपासून स्टार एअरवेजची नाशिक- बेळगाव ही सेवाही बंद पडली आहे. मात्र, अलायन्स एअरच्या अन्य चार शहरांना जोडणाऱ्या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच केवळ गुजरातमध्ये होणाऱ्या संभाव्य निवडणुकांमुळे तेथील राजकीय उडान नीट व्हावे यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने नाशिकच्या सेवेत कपात करून ही येथील कंपनीची विमाने गुजरातमध्ये नेल्याची चर्चा आहे.
पाणी पळवले, आता विमानसेवाही....
महाराष्ट्राच्या हद्दीत पावसाचे पडणारे पाणी गुजरातला वाहून जाते. त्याबाबत महाराष्ट्र शासनाशी करार करण्याची तयारी सुरु आहे. त्याला विरोधही झाला आहे. आता पाण्याबरोबरच विमानसेवादेखील पळवली जात असल्याची उद्योजकांत चर्चा आहे.