नाशिकरोड : राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी आलेल्या गुजरात पोलिसांच्या १५ तुकड्यातील पोलीस कर्मचारी आज स्पेशल रेल्वेने रवाना झाले. राज्यातील विविध जिल्ह्यात व मतदार संघात बंदोबस्तासाठी आलेले गुजरात पोलीस आज स्पेशल रेल्वेने गुजरातला रवाना झाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दुपारी तीन तुकड्यातील पोलीस कर्मचारी रवाना झाले. गुजरात पोलिसांना घेऊन जाणारी स्पेशल रेल्वे ही अहमदाबाद जवळील पालनपुर येथे सर्वांना सोडणार होती.गुजरातहून बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या नियोजनावरून नाराजी व्यक्त केली. यापेक्षा पश्चिम बंगाल येथे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेलो असतांना तेथे चांगली व्यवस्था असल्याचे गुजरात पोलिसांनी बोलुन दाखविले. पोलीस अधिकाऱ्यांनी वाहन सुद्धा दिले नसल्याची तक्रार केली. या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी असलेल्या राज्यातील पोलिसांना व्यवस्थित झोपण्याची सोय होती. मात्र इतर राज्यातून आलेल्या पोलिसांकडे लक्ष दिले गेले नसल्याची खंत या पोलिसांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)