नाशिक : देवदर्शनाच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रवेश करून गुजरातच्या सराईत गुन्हेगारांच्या ‘भाभोर गॅँग’च्या मुसक्या येथील स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातच्या दाहेद जिल्ह्यात जाऊन बांधल्या. टोळीप्रमुखासह दोघे पोलिसांच्या हाती लागले असून उर्वरित दोघे अद्याप फरार अहेत. टोळीप्रमुख कांतीभाई उर्फ कांती तेरसिंग भाभोर (४०,रा.खजुरिया सिमोडा, जि. दाहेद) याच्याविरूध्द गुजरातमध्ये विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे ३७ गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून नाशिक जिल्ह्यातील घरफोड्या, दरोड्यांसारखे ७ गुन्हे उघडकीस आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात घरफोड्यांसह दरोडे टाकणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. पथकाच्या हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा सुक्ष्म अभ्यास पोलिसांनी केला. फुटेजनुसार तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्याअधारे गुन्हेगार गुजरात-मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील असल्याची खात्री पोलिसांना पटली. यानंतर अपर पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांनी पोलीस निरिक्षक के.के.पाटील, सहायक निरिक्षक स्वप्नील राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तपासी पथक तयार करून गुजरातच्या दिशेने रवाना केले. पथकाने तीन दिवस गुजरातमधील दाहेद जिल्ह्यात तीन दिवस तळ ठोकून तेथील स्थानिक नागरिकांकडून माहिती जाणून घेत संशयित कांतीभाईसह नाना उर्फ नानु अगतराव मंडले (२७,रा.सहकारनगर, जि. दाहेद), मांदो उर्फ वकील तेरसिंग भाभोर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे दोघे साथीदार विनु तेरसिंग भाभोर, देवला जोरीया भाभोर यांच्या मदतीने सटाणा, वावी, नांदूरशिंगोटे आदि ठिकाणी जिल्ह्यात घरफोड्या केल्याची क बुली दिली आहे. देवला, विनु अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या तीघांकडून जिल्ह्यातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
देवदर्शनासाठी महाराष्ट्रात येत दरोडे टाकणारी गुजरातची ‘भाभोर गॅँग’ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 7:34 PM
जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात घरफोड्यांसह दरोडे टाकणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील घरफोड्यासारखे ७ गुन्हे उघडकीसटोळीप्रमुखासह दोघे पोलिसांच्या हाती लागले