नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज माघारीच्या दिवशी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने काही जागा बिनविरोध निवडून आल्या. राजकीय घडामोडीमुळे रंगलेल्या माघारी नाट्यानंतर जागा बिनविरोध येताच उत्साही कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण केली जात होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयांमध्ये सर्वत्र अशीच परिस्थिती दिसून आली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी दुपारपर्यंत अर्ज माघारीसाठी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अगोदरपासूनच प्रयत्न होत असताना उर्वरित प्रभागांमध्येदेखील बिनविरोध करण्याचे काटेकोर प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार कालपासूनच प्रयत्न सुरू झाले होते. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी काही प्रभागांमध्ये जागा बिनविरोध करण्यालादेखील यश आले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये केवळ सात आणि नऊ तसेच ११ सदस्य संख्या आहे, अशा ठिकाणी काही उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडण्यात आल्याने काही जागा बिनविराेध होऊ शकल्या. उर्वरित पाच ते तीन जागांसाठी अशा ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक रंगणार आहे.
कमी सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले, त्यानुसार काही ठिकाणी यशदेखील आले. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये अवघ्या दोन ते तीन जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. जिल्ह्यात सात सदस्यसंख्या असलेल्या १५३, नऊ सदस्यसंख्या असलेल्या २९१, अकरा सदस्यसंख्येच्या १०८, १३ सदस्य असलेल्या ३२ आणि १५ सदस्यसंख्येच्या १४ तर १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या २३ इतकी आहे. ५८९५ इतक्या सदस्यांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज माघारीची मुदत होती. त्यासाठी तालुक्यांमध्ये तसेच गावपातळीवर अनेक घडामोडी घडल्या. अर्ज माघारीनंतर तहसील कार्यालय आवारातच गुलाल उधळत मिरवणूक काढली. बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी एकमेव अर्ज राहिल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात होता. दरम्यान, तहसील कार्यालय आवारात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर पार्किंग केलेल्या गाड्यांचीदेखील रांग लागलेली होती.