नाशिक : महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कक्षाबाहेर एक शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमून इतर १७ बंदूकधारी सुरक्षारक्षक जलशुद्धीकरण केंद्रांसह गंगापूर धरणावर नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, राजीव गांधी भवनमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीस शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला. महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे मुंबईतील महाराष्टÑ स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांच्याकडून एकूण ४५ सुरक्षारक्षक नेमण्यासाठी येणाºया १ कोटी ४३ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात आला होता. या सुरक्षारक्षकांमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षारक्षक आहेत. यावेळी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष व स्थायीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी राजीव गांधी भवनमध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षक नियुक्तीस विरोध दर्शविला. महापालिका मुख्यालयात बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याऐवजी पोलिसांची नेमणूक करावी अथवा महापालिकेच्याच सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही तिदमे यांनी केली. जगदीश पाटील यांनी सांगितले, राजीव गांधी भवनमध्ये एवढ्या बंदूकधारी सुरक्षारक्षकांची गरज नाही. त्याऐवजी सदर बंदूकधारी सुरक्षारक्षक हे मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर तसेच संवेदनशील ठिकाणी नेमण्यात यावेत. पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेच्या कर्मचाºयांनाही प्रवेश करणे मुश्कील होते. जेथे आवश्यकता आहे तेथे बंदूकधारी सुरक्षारक्षक प्राधान्याने नेमावेत, नंतर राजीव गांधी भवनचा विचार करावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी राजीव गांधी भवनमध्ये सर्वच बंदूकधारी सुरक्षारक्षकांची आवश्यकता नसून, आयुक्तांच्या दालनाबाहेर एकाची नियुक्ती करावी आणि इतरांची जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरणावर नेमणूक करावी, असे आदेशित केले. दरम्यान, सूर्यकांत लवटे यांनी ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी पथदीप बंद असल्याची तक्रार केली, तर जगदीश पाटील यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मुशीर सय्यद यांनी इदगाह मैदान हे केवळ खेळासाठीच उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
जलशुद्धीकरण केंद्रांवर आता बंदूकधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:38 PM