- शरद नेरकरनामपूर (नाशिक) : ‘गुरुजी, तुमच्या खिचडीच्या खात्यात एक रुपया जमा झाला काय, तेवढे बघा अन् लागलीच कळवा...!’ असा संदेश मुख्याध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर येताच खातरजमा करण्यासाठी सगळ्यांनी बँकेत धाव घेतली. या एक रुपयाच्या संदेशामुळे हेडमास्तरांची दमछाक तर झालीच शिवाय नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.त्याचे झाले असे की, अंगणवाडी प्राथमिक, माध्यमिक शाळांतील मुलांसाठी पोषणआहार दिला जातो. यासाठी शासन अनुदानही देते. हे अनुदान तालुक्याच्या पंचायत समितीकडून दिले जायचे. मात्र हा निधी प्राप्त व्हायला बराचसा कालावधी जायचा. या अडचणी येऊ नयेत म्हणून सदर निधी वेळेत पोहोचावा यासाठी आता थेट केंद्रस्तरावरु न मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या बँक खात्याची खातरजमा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी भलतीच शक्कल लढविली. केंद्रस्तरावरून प्रत्येक मुख्याध्यापकांच्या खात्यावर एक रु पया टाकण्यात आला आणि तो मिळाला की नाही, याची मोबाईल संदेशाद्वारे खात्री करून घेण्यात आली. पण एक रुपयाची ही ‘सरकारी शक्कल’ मुख्याध्यापकांना भलतीच महागात पडली. भाववाढ झालेले पेट्रोल जाळून आणि विद्यार्थांचा अभ्यास बुडवून त्यांना ‘एक रुपया’ शोधावा लागला. गुरु जी बँकेत पोचले तर तिथे गुरुजीच गुरुजी, जो तो एकमेकाला ‘तुमचा एक रुपया सापडला काय?’ अशी विचारणा करताना दिसतआहेत.
एक रुपयासाठी गुरुजींची उडाली धांदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:17 AM