लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सर्वसामान्य सदस्यांच्या प्रश्नांवरील चर्चेऐवजी गत संचालक व बरखास्त संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचारावरून आरोप-प्रत्यारोप करणारे त्यांचे कार्यकर्ते, कर्जावरील व्याजदर कपात, ठेवीवरील व्याज, लेखापरीक्षणासाठी शासकीय लेखापरीक्षकाची मागणी, डिव्हिडंड मागणी याबरोबरच नवीन संचालक मंडळाच्या निवडणुकीची सभासदांनी केलेली मागणी या विषयांवर नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉइज को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली़ विशेष म्हणजे हमरी-तुमरी, माइकचा ताबा अन् गोंधळातच विषय मंजूर झाले अन् गुरुजींनी गोंधळाची परंपरा याहीवर्षी कायम ठेवली़परशुराम साईखेडकर नाट्यगृहात एनडीएसटी सोसायटीची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि़२१) सकाळी वाजेच्या सुमारास संस्थेचे प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली़ दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर प्रास्ताविकात करे यांनी बँकेचा नफा वाढविण्याबरोबरच कारभार सुरळीत केल्याचे सांगितले़ यानंतर सभेपुढे ठेवण्यात आलेल्या विषयांवर चर्चेस सुरुवात करण्यात आली़ संस्थेच्या गतवर्षीच्या इतिवृत्ताचे वाचन सुरू असताना काही सदस्य जागेवरून उठून व्यासपीठावर गेले व पूर्वीच्या संचालकांनी तसेच बरखास्त संचालकांनी केलेली बॅटरी खरेदी, स्टेशनरी खरेदी, कर्जवितरणात कागदपत्रांची अनियमितता याबाबत आरोप-प्रत्यारोप केले़ सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक बाळासाहेब ढोबळे यांनी खर्चात कपात केल्याचे तर मोहन चकोर यांनी एनडीसीसीमध्ये अडकलेल्या रकमेमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत सांगितले़ प्रकाश सोनवणे यांनी ताबडतोब निवडणुका घेण्याची मागणी करून निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीची मागणी केली़ तर पुरुषोत्तम रकिबे यांनी ही वार्षिक सर्वसाधारण सभा नसून आगामी निवडणूक प्रचाराचा आखाडा बनल्याची टीका केली़ या सभेत विविध संघटनांचे सदस्य तसेच आजी-माजी संचालक व त्यांच्या समर्थक सदस्यांनी नेहमीप्रमाणे व्यासपीठावर घातलेल्या गोंधळामुळे केवळ सर्वसामान्य सदस्यच नव्हे तर जिल्हा उपनिबंधक करे यांनाही बोलण्यास वाव मिळाला नाही़सुमारे सव्वा तासापासून सुरू असलेला गोंधळ आटोक्यात येत नसल्याने व्यासपीठावर पोहोचलेल्या काही सदस्यांनीच राष्ट्रगीत सुरू केले व सभेची समाप्ती झाली़ यावेळी व्यासपीठावर कार्यालयीन अधीक्षक जयप्रकाश कुंवर तसेच बरखास्त संचालक सदस्य उपस्थित होते़ १२ हजार २२ सभासद संख्या असलेल्या या सोसायटीवर २० डिसेंबर २०१६ पासून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर कर्जवसुली मोठ्या प्रमाणात झाली असून, कर्जाच्या थकबाकीचे शेकडा प्रमाण ०़५२ टक्के आहे़
गुरुजींची गोंधळाची परंपरा कायम
By admin | Published: May 22, 2017 1:58 AM