राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा नाशिक-सापुतारा मार्गावरून वणी येथून शहराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी त्वरित वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील राजपूत सचिन पाटील यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. करंजखेडजवळील फाट्यावर पोलिसांनी शनिवारी (दि.१६) रात्री सापळा रचला. यावेळी संशयास्पद कंटेनर (आरजेजीए ३९१४) आणि दुसरा कंटेनर (आरजे ३० जीए ३८२४) एकापाठोपाठ आले असता पोलिसांनी शिताफीने ते रोखले. या दोन्ही कंटेनरची पथकातील पोलिसांनी झडती घेतली असता यामध्ये मिराज कंपनीचा राज्यात विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. यामुळे पोलिसांनी तत्काळ या दोन्ही कंटेनरचे चालक, वाहक संशयित महेंद्रसिंह, शंबुसिंहानी सोलंकी (३८, रा. उदयपूर), श्यामसिंग चतुरसिंह राव (४४), अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत (५६, दोघे, रा. बिदसर, चितोडगड), लोगल मेहवाल (४८,रा. उदयपूर) यांना गुटख्याची नाशिकमार्गे राज्यात विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यांनी गुटख्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेले दोन्ही मोठे कंटेनर जप्त केले आहेत. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे एक कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---कोट--
राजस्थानच्या उदयपूरमध्ये गुटख्याचा मुख्य पुरवठादाराचा शोध घेत त्याच्याविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. हा गुटखा बंगळुरू येथे घेऊन जात असल्याचा बनाव संबंधितांनी केला; मात्र गुटखा हा नाशिकमार्गे राज्यातील मुंबई किंवा अन्य दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी वाहतूक करून आणला जात होता. चाैघा संशयितांची चौकशी केली जात असून, मिळालेल्या माहितीवरून मुख्य म्होरक्यालाही अटक केली जाईल.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक
---
फोटो आर वर १७पोलीस नावाने सेव्ह आहे.