शहरात राजरोसपणे गुटख्याचा साठा आणि विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर जुने नाशिक, नाशिक रोड हा भाग गुटखा पुरवठ्याचे केंद्र बनल्याचे समोर आल्यानंतर यानंतर अन्न-औषध प्रशासनाने खडबडून जागे होत ‘नेटवर्क’ तपासले. जुने नाशिकमधील अमरधाम रोडवरील कथडा परिसरातील उस्मानिया टॉवरमधील गोदामावर पुन्हा छापा मारला. या ठिकाणाहून पथकाला प्रतिबंधित गुटख्याची पोती आढळून आली. सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये पानमसाला व अन्य सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. २५ नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी अन्न, औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे लाखो रुपयांच्या गुटख्याचा मोठा साठा जप्त केला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी संशयितांनी गुटख्याचा साठा केल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहायक आयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर.डी. सूर्यवंशी, अ.उ. रासकर, पी.एस. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत संशयित एजाज काफील शेखच्या (३२, रा. पठाणपुरा, चव्हाटा) विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (फोटो २१ गुटखा)
जुन्या नाशकात पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:14 AM