सटाणा : शहरातील अतिक्र मण असो वा कोरड्या कूपनलिका या प्रश्नांबाबत शिवसेनेने पालिकेतील सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रविवारी शिवसेनेने थेट जलशुद्धीकरण केंद्रावर धडक दिली. शुद्धीकरणाची प्रक्रि या शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे होत नसल्याचे सत्ताधाऱ्यांचे पितळ पुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे.रविवारी जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी केंद्रात असंख्य त्रुटी आढळून आल्याचे निदर्शनास आणून दिले. येत्या आठ दिवसांत यात सुधारणा न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पालिकेकडून मानवी शरीरास अपायकारक ठरणारे पाणी पुरवले जात असून, जनतेच्या जिवाशी चालू असलेला खेळ त्वरित थांबविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शहरप्रमुख शरद शेवाळे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे आदि शिवसैनिकांनी नववसाहती-तील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत केंद्रातील असंख्य त्रुटी आढळून आल्याचे सांगण्यात आले. केंद्रातील यंत्रणा केवळ यांत्रिक पद्धतीने सुरू असून, त्यात शास्त्रीय पद्धतीचा पूर्णपणे अभाव आहे. पाणी शुद्धीकरण होण्यासाठी वापरात येणारी रसायने मिश्रण करण्याची यंत्रणा बंद असून, त्याचे प्रमाणही योग्य नसल्याचे यावेळी दिसून आले. शहरवासीयांना पुरविण्यात आलेल्या पाण्याचा टीडीएस यावेळी तपासाला असता तो दोनशेच्या घरांत आढळून आला. त्यामुळे हा एकप्रकारे शहरवासीयांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे सेनेने म्हटले आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर भेट देणाऱ्या किंवा पाहणी करणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्यासाठीचे नोंदपुस्तकच ठेवलेले नसल्याचेही आढळून आल्याने या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. या पाण्याचे नमुनेदेखील घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया निर्दोषपणे कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून, त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पाहणीप्रसंगी उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शहरप्रमुख शरद शेवाळे, अरविंद सोनवणे, आनंदा महाले, सचिन सोनवणे, बापू करडीवाल, राजनिसंग चौधरी, अमोल पवार, दुर्गेश विश्वंभर, मंगलिसंग चौधरी, नंदू सोनवणे, भूषण सूर्यवंशी गणेश देसले,आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)
सटाणा शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा
By admin | Published: July 19, 2016 12:21 AM