नाशिक : ओझरच्या विमानतळावरील मद्य पार्टीचे प्रकरण गाजत असताना नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही अशाच प्रकारे शुक्रवारी मद्यपार्ट्या झडल्याचे वृत्त आहे. एका वाइन फेस्टिव्हलसाठी विद्यापीठाच्या ‘यश इन’ या इमारतीत वास्तव्यासाठी उतरलेल्या काही पर्यटकांच्या कक्षात चक्क अशाच पार्ट्या झाल्या असून, ज्ञानगंगेच्या दारी थेट मद्यगंगा अवतरण्याच्या प्रकाराने विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी चक्रावले आहेत. विद्यापीठ व्यवस्थापनाने मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.विद्यापीठाच्या आवारात यश इन ही इमारत मोठ्या परीषदा आणि तत्सम उपक्रमांसाठी बांधण्यात आली आहे.एखाद्या तारांकीत हॉटेल्सच्या धर्तीवर असलेल्या या इमारतीचा परिषदांव्यतिरिक्त वापर होत नसल्याने विद्यापीठाकडून अनेकदा भाड्यानेही खोल्या दिल्या जातात. शनिवारी विद्यापीठापासून हाकेच्या अंतरावर एका वायनरीत फेस्टीवल साजरा होणार आहे. त्यासाठी एका फर्मने विद्यापीठाच्या खोल्या पर्यटकांसाठी भाड्याने घेतल्या आहेत. आधीच वाईन फेस्टीवल, असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला या विद्यापीठाच्या धुंद वातावरणाचा प्रभाव त्या पर्यटकांवर ्रअसा झाला की, पर्यटकांनी म्हणून पवित्र ज्ञानदान करणाऱ्या विद्यापीठाच्या आवारातच अशा प्रकारे रसपान केले.विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचण्याचे ब्रीद असताना तेथे मद्याचे प्याले उसळल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयाची माहिती घेऊ असे सागिंतले. मुक्त विद्यापीठाच्या यश इन इमारतीतील खोल्या भाड्याने दिल्या जातात. शैक्षणिक कार्यासाठी खोल्या भाड्याने घेणाऱ्यांना आणि अन्य कामे किंवा परीषदांसाठी येण्यांसाठी वेगवेगळे दर आहेत. वाईन फेस्टीवलसाठी आलेल्या पर्यटकांसाठी एका फर्मने ७० ते ८० खोल्यांची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे खोल्या भाड्याने देताना मात्र मद्यपान करू नये अशी स्पष्ट अट घालण्यात येते. तरीही मद्यपान झाले किंवा काय याची माहिती नाही. एका बैठकीसाठी मी दिवसभर मुंबईत व्यस्त होतो. आता शनिवारी सकाळी विद्यापीठात जाऊन संबंधीत विभागाकडून माहिती घेतो असेही अतकरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
ज्ञानगंगेच्या दारी ‘मद्यपीं’ची वारी
By admin | Published: February 06, 2015 11:53 PM