ओझरटाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर टाऊनशिपच्या बंद असलेल्या गेट क्रमांक एकजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.रविवारी (दि.२७) रात्रीच्या दरम्यान एच. ए. एल. कामगारांच्या ओझरटाऊनशिपमधील बंद अवस्थेतील प्रवेशद्वार एकजवळ बिबट्याचा बछडा (६ महिने) मादीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच गतप्राण झाला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ओझर पोलीस ठाणे व वनविभागाला फोनद्वारे माहिती दिली असता ओझर पोलीस कर्मचारी व चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले.सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव येथील वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी यांनी चांदवड वनपरिमंडळ अधिकारी पी. पी. सोमवंशी, वनरक्षक व्ही. आर. टेकणार, वनमजूर वसंत देवरे, वाहनचालक अशोक शिंदे यांच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
मृत बछड्याचे ओझर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल तोरणपवार यांनी शवविच्छेदन केले असता आतील बाजूस मार लागल्याने अतिरक्तस्राव होऊन बछड्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर, श्रीकांत शेजवळ, राहुल गायखे, सौरभ जाधव आदी उपस्थित होते.