नाशिकरोड : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख निवासी भत्ता व वसतिगृहामधील समस्यांबाबत सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.सामनगावरोड येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयातील प्रभारी सहसंचालक ज्ञानदेव नाठे यांच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. भत्ता समान मिळावा, वसतिगृहाला पूर्ण निवासी व भोजन भत्ता समाज कल्याण वसतिगृहप्रमाणे मिळावा, अशी मागणी करण्यात आली़ आंदोलनात राविकॉँचे तालुका अध्यक्ष विद्यार्थी संदेश टिळे, उपाध्यक्ष कैलास कळमकर, संदेश चव्हाण, सतीश कवळे, ऋ षिकेश जाधव, मयूर महाले, प्रतीक धोंडे, संकेत तासकर यांच्यासह मेरी येथील वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हा प्रमुख रवींद्र दातीर, शहर प्रमुख हार्दिक निगळ, विशाल सोनजे, संदीप आहेर, आकाश गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
वसतिगृहातील गैरसोयी; तीन तास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:13 AM