सातपूर : येथील एका कंपनीचे ई-मेल अकाउंट हॅक करून परदेशात याच कंपनीच्या नावाने बँकेत बनावट खाते उघडून सातपूरच्या कंपनीची सुमारे साडेदहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद सातपूर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करून हा गुन्हा सायबर क्र ाइमकडे वर्ग केला आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम इक्विपमेंट या कंपनीचा ई-मेल अज्ञात संशयिताने हॅक केला आणि याच कंपनीच्या नावाने यूकेमधील नेटवेस्ट बँकेत बनावट खाते (खाते क्र .जी.बी. 87 एनडब्ल्यूबीके 52210018868843) उघडण्यात आले. मूळ कंपनीच्या बँक खात्यात जमा होणारे जमैका येथील (लाँस्को डिस्ट्रिब्युटर्स कंपनी) ग्राहकाचे पैसे परस्पर बनावट खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कंपनीने बनावट खात्यात १५ हजार ३२३ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १० लाख ३४ हजार ३३३ रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुप्रीम इक्युपमेंट कंपनीचे संचालक किरण निंबाजीराव शिंदे, रा. डिफोडिल्स अपार्टमेंट, सीरिन मेडोज कॉलनी यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सातपूर पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
ई-मेल अकाउंट हॅक करून दहा लाखांची फसवणूक
By admin | Published: December 22, 2016 12:28 AM