लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ही निवडणूक समाजाला लागलेली विकृती संपविण्याची संधी आहे. समाजाला बदनाम करणाऱ्यांना बाजूला ठेवण्याची ही वेळ आहे. समाजाची ही संस्था राजकारण करण्याची जागा नव्हे, या शब्दात सत्ताधारी पॅनलच्या नेत्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी विरोधी पॅनलच्या नेत्यांवर टिका केली.चोपडा बॅँक्वेटमध्ये प्रगती पॅनलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात नीलिमा पवार बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनाधिपती विनायकराव पाटील, आमदार अनिल कदम, माजी आमदार शांताराम अहेर, शिरीषकुमार कोतवाल, दिलीप बनकर, ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, अरविंद कारे, माणिकराव बोरस्ते, श्रीराम शेटे, रवींद्र देवरे, डॉ. सुनील ढिकले, भास्कर बनकर, डॉ. प्रशांत पाटील, नामदेव गोडसे, शैलेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला प्रास्ताविक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केले. आमदार अनिल कदम यांनी सांगितले की, मविप्र संस्था ही समाजधुरिणांची संस्था आहे. या संस्थेत नीलिमा पवार यांनी पारदर्शक आणि त्रिसूत्री पद्धतीने कामकाज केल्याने त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे. माणिकराव बोरस्ते यांनी सांगितले की, सर्वांनी समाजासाठी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. सध्या निवडणुकीत वेडेवाकडे विचार काही जण करीत आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच आपली इच्छा आहे. रामचंद्र बापू पाटील यांनी सांगितले की, नीलिमा पवार हे समाजाभिमुख नेतृत्व असल्याचे त्यांनी त्यांच्या कामातून सिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वांनी या प्रवाहात सामील व्हावे. अध्यक्षपदावरून बोलताना वनाधिपती विनायकराव पाटील यांनी सांगितले की, समाजाच्या या निवडणुकीत कोणीही शिवराळ प्रचार करू नये. संयमाने व शांततेने निवडणूक लढविली पाहिजे. आपण सर्वजण संस्थेचे विश्वस्त आहोत, हे समजून सामूहिक नेतृत्व केले पाहिजे.एका महिलेच्या हातात सत्ता देण्याचा अपप्रचार केला जात आहे. हीच महिला गृहिणी म्हणून काटकसर करीत असते. लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप असलेली हीच महिला वेळप्रसंगी हाती शस्त्र घेऊन दुर्गावतार घेते. उमेदवारी देताना सर्वांचेच समाधान होऊ शकत नाही; मात्र सर्वांनी समजून घेऊन आपल्या पाठीशी उभे राहावे. राजकारण करण्यासाठी दुसऱ्या जागा आहेत. ही राजकारणाची जागा नव्हे.- नीलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र
ही जागा राजकारणाची नव्हे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:17 AM