नाशिक: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसाार नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी गारपीटही झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काही तालुक्यांमध्ये घरांचे पत्रे उडाले तर अनेकांच्या शेतातही पाणी साचले. रात्री उशिरा अनेक तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी सुरूच होत्या.
राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. गुरुवार आणि शुक्रवारी मराठवाड्यासह उत्तर, मध्य महाराष्ट्राच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन अडीच तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.
कळवण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे देखील नुकसान झाले आहे. दुपारपासून दाटून आलेले आभाळ आणि सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने परिसराला झोडपून काढले. दिंडोरीतही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पेठ तालुक्यात मात्र पावसाच्या हलक्या सरींची बरसात सुरूच होती. सिन्ररला तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजांच्या कडकडाटास जोरदार पाऊस झाला. त्याचप्रमाणे सटाणा शहर व तालुक्यात देखील वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळला. सुरगाणा तालुक्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी कोणत्याही नुकसानीचा अंदाज समेार आलेला नाही. पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वरही रात्री पावसाला सुरुवात झाली. मालेगावमध्येदेखील सायंकाळनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.चांदवडला पावसाने झोडपून काढले ताहराबाद मंडळातील अंतापूर या गावी गारपीट झाली.
--कोट--
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस बरसला. बागलाणमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही. शेतीपीक नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच शासनाला पाठविण्यात येईल.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी