बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट आणि आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. आज मंगळवारी सायंकाळी केरसाणे, दसाणे, मुंगसे, पिंगळवाडे, अंतापूर, मुल्हेर परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. तब्बल आठ मिनिटे झालेल्या गारपीटमुळे कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो व भाजीपाला पीक अक्षरशः भुईसपाट झाले. काढणीवर आलेले गहू, हरभरा, भाजीपाला पिकाची अक्षरशः माती झाली असून हाता तोंडाशी आलेला घास या आस्मानी संकटाने हिरावून नेला. गेल्या रविवारी, सोमवारी जायखेडा, ब्राम्हणपाडे, आसखेडा, भडाने, पिंपळकोठे, अंतापूर, मुल्हेर, जामोटी, अलियाबाद, तळवाडे दिगर, पठावे दिगर, मोरकुरे, किकवारी आदी परिसराला पावसाने झोडपले असून एकूण बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे.
गारपीट सारख्या नैसर्गिक संकट काळात नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याआहे. लवकरच संपूर्ण पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करून भरीव भरपाईची मागणी करणार आहोत.
-आमदार दिलीप बोरसे, बागलाण