नाशिक : शहरातील महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्र म, स्पर्धा, विविध डेज तसेच वार्षिकोत्सव होत आहेत. कॉलेजरोडवरील एचपीटी व आरवायके महाविद्यालयातही ‘डेज’ची सुरुवात झाली असून, युवक-युवतींमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. महाविद्यालयातील युवतींनी पारंपरिक वेशभूषेला म्हणजेच साडी, तर युवकांनी कुडता आणि फेटा असा पारंपरिक पोषाख परिधान करून या दिवसाचा आनंद लुटला. विविध ‘डेज’ साजरे करताना केवळ विद्यार्थी-विद्यार्थिनी महाविद्यालयात ‘थीम’नुसार नटून-थटून येत असतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ठेवणीतल्या साड्या परिधान करून शिक्षिकाही विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होतात. साडी डे, रोज डे, चॉकलेट डे, ब्लॅक अॅण्ड व्हाईट डे, ट्रॅडिशनल डे, रेट्रो डे, बॅक टू बचपन डे, ट्विन्स डे यांसारखे डेज जेव्हा महाविद्यालयात साजरे होतात, तेव्हाचा माहोल हा वाचण्यापेक्षा अनुभवण्याचा जास्त असतो. असाच काहीसा माहोल कॉलेजरोड परिसरात सध्या रोजच दिसून येत आहेत. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी विविध प्रकारच्या साड्या परिधान करून आल्याने जल्लोषपूर्ण वातावरण दिसत आहे. महाविद्यालयात होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्र मांचे फोटोशूट विद्यार्थी करत आहेत. अशात ‘साडी डे’ आणि फोटोशूट नाही, टिकटॉकचे व्हिडीओ नाही असे होणे शक्यच नाही. यावेळी तरुण-तरुणींनी सकाळपासून आपल्या मोबाइलवर आपले विविध फोटो शूट करत असताना दिसले. तसेच काहीजण टिकटॉकचे व्हिडीओ बनविताना दिसत होते.
एचपीटी, आरवायकेत विविध ‘डेज’चा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:13 AM