लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : संततधार पाऊस व धरण क्षेत्रातून पाण्याच्या विसर्गामुळे सायखेडा परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आता पंचनामा कधी होतो याची वाट पाहत आहे. सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव आदी गावांतील शेतांमध्ये अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे पूर ओसरला तरी पुराच्या पाऊलखुणा अद्यापही आहेत. शेतातील भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या वीटभट्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सायखेडा व चांदोरी परिसरातील पूरस्थिती आज पाणी ओसरल्याने पूर्व पदावर आली आहे. यावेळी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पूरस्थिती गंभीर झाली नसली तरी पुरामुळे शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. योग्य वेळी नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग होत राहिल्याने मोठ्या पुराचा धोका टळला. अन्यथा गोदाकाठ पूर्ण जलमय झाला असता; मात्र शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सायखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पानवेली नदीबाहेर काढल्या जात होत्या. पण काम अतिशय संथ गतीने सुरू होते. पूर आला असता पाटबंधारे खात्याला जाग आली आणि रात्री जेसीबीच्या साह्याने पानवेली काढण्याची कसरत करावी लागली. पानवेलींमुळे सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो हे माहीत असतानाही पाटबंधारे खाते वेळकाढूपणा का करते, असा सवाल उपस्थित होत आहे. सकाळपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.
हजारो हेक्टर शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:15 AM