‘जहान’ इंटरनॅशनल टूर्सच्या नावाने ‘दुकान’ थाटून मुस्लीम बांधवांना हज-उमराह यात्रा घडविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दोन वर्षांपूर्वी शहरात उघडकीस आला होता. जिल्हाभरातील जवळपास १३०० नागरिकांनी संशयित टूर ऑपरेटर अब्दुल मतीन मनियारविरुध्द तक्रारी दाखल केल्या होत्या. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही संबंधित संशयित मनियारविरुद्ध कारवाई पोलिसांकडून केली जात नसल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्डेय यांची भेट घेत कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर अजिज पठाण, जमीर शेख, शकील सय्यद, ॲड. अफजल पठाण, डॉ. असलम पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मनियार परदेशात पसार झाला तर त्याचे इतर साथीदार नाशिक जिल्ह्यातच वास्तव्यास असल्याचे शिष्टमंडळाने पाण्डेय यांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच भिवंडी पोलिसांकडून या फसवणूकप्रकरणी संशयित मुस्तकीम मनियार (रा.नाशिक) यास नाशकातून अटक केली आहे. यामुळे आता नाशिक पोलिसांच्या कारवाईकडे समाजाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडी पोलिसांकडून या फसवणूकप्रकरणी संशयित मुस्तकीम मनियार याला नाशकातून अटक केली आहे. यामुळे आता नाशिक पोलिसांच्या कारवाईकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
---इन्फो---
तीनशेहून अधिक इच्छुक यात्रेकरूंना हुलकावणी
हज यात्रेला जाणाऱ्या तब्बल तीनशेहून अधिक भाविकांना हज व उमराह यात्रेला न पाठवता त्यांची ही फसवणूक केल्याचे उघड झाले. या घटनेनंतर शहरातील हज व उमराहसाठी जाणाऱ्या शेकडो भाविकांनी एकत्र येऊन अब्दुल मतिन मनियार यांच्यासह त्याने नेमलेल्या एजंट यांच्याविरोधात हज व उमराहचे पैसे घेऊनही यात्रेला न पाठवत फसवणूक केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.