ओझरटाऊनशिप : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बुधवार, दि.२१ ते शनिवार दि. २४ एप्रिलपर्यंत कारखाना बंद ठेवण्यात आला होता. आता सोमवारपासून कारखाना पूर्ववत सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा दि. २६ ते २८ एप्रिल या कालावधीत कारखान्याचे कामकाज पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे. ओझरसह परिसरात वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करून ओझर व्यापारी असोसिएशनने आठ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास ओझरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ओझरटाऊनशिपमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्याचा निश्चय कामगार व व्यवस्थापनाने करून २१ ते २४ एप्रिलपर्यंत चार दिवस एच ए एल कारखाना (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेली चार दिवस कारखाना बंद होता. सोमवारी कारखान्याचे कामकाज पूर्ववत सुरू होणार होते; परंतु कोरोना साखळी तोडण्याच्या पार्श्वभूमीवर कारखाना आणखी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या तीन दिवसांच्या बंद काळातील कामकाज पुढे ज्या आठवड्यात शासकीय सुट्या येतील त्यावेळी सुटीच्या कालावधीत पूर्ण केले जाणार आहे.
कामगारांनी फारच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे , सुरक्षित राहून आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक विभाग एचएएल कामगार संघटनेने केले आहे.