आरोप : सहकार खात्याकडून मिळतेय अभयनाशिक : ओझर टाऊनशिप येथील एचएएल एम्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीत सन २००१ ते २०१३ या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सुमारे ५५ कोटींचा गैरव्यवहार करणार्या माजी संचालकांना सहकार खाते पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारकर्ते प्रवीण तिदमे यांनी केला आहे. एचएएल क्रेडिट सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणी येथील सभासदांनी लढा पुकारला होता. त्यानुसार फेर लेखापरीक्षण अहवालानुसार ५५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर संशयित संचालक आणि कर्मचार्यांवर जलद कारवाई होणे अपेक्षित असतानाही सहकार खात्याकडून नरमाईची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप तिदमे यांनी केला आहे. सन २०१० पासून संस्थेचे पाच हजार सभासद आणि कृती समिती या गैरव्यवहारांचा पाठपुरावा करीत आहे. संस्था डबघाईस आणणार्या व्यक्तींवर कारवाई होत नसल्याने संस्थेचे आणि सभासदांचे अतोनात नुकसान होत असून, संबंधित संस्थाचालकांना कोणतीही सूट, सवलत, स्थगिती देऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे. या संचालकांनी मालमत्ता विक्री, गहाण, हस्तांतरित होऊ नये यासाठी त्वरित आदेश काढावेत, संशयित संचालक आणि त्यांच्या नातलगांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या २ जूनपासून सभासद विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
एचएएल सोसायटी : गैरप्रकार करणार्यांवर मेहेरनजर
By admin | Published: May 18, 2014 11:30 PM