ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली बोलणी फिसकटल्याने नाशिकसह देशभरातील नऊ विभागातील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत.गेली ३४ महिने अधिकारी वर्ग वाढीव पगार वाढीचा लाभ घेत असून फक्त कामगारांना त्यांच्या हककांपासून दूर ठेवण्याचे काम एचएएल उच्च व्यवस्थापन करत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. प्रलंबित वेतन कराराच्या बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाला दिल्याप्रमाणे कामगार वर्गाला हक्काची रास्त वेतन वाढ द्यावी या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून एचएएल कर्मचारी व्यवस्थापनाशी चर्चा करत आहेत. व्यवस्थापनाने चांगला वेतन करार देण्याच्या आश्वासन , पाच वर्ष मुदतीच्या वेतन कराराची मागणी सोडून सर्व संघटना दहा वर्ष मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या आहेत. परंतु त्यानंतर ही व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली आहे. वाढीव पगारवाढीचे फरक पूर्ण मिळून वाढीव पगारवाढीचा लाभ अधिकारी वर्ग गेली ३४ महिने घेत असून कामगार वर्गाला जाचक अटी टाकून तुटपूंजी वाढ दिल्याने व्यवस्थापनाकडून कामगार वर्गाला दिल्या जाणाऱ्या अपमानकारक वागणुकीबद्दल तीव्र असंतोष, नाराजी पसरला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.आस्थापनेप्रति कामगार प्रामाणिक असून, कंपनी जर आर्थिक संकटात असेल तर अधिकारीवर्गाला दिलेली वेतनवाढ रद्द करावी आणि आर्थिक स्थिती उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगारांची वेतनवाढ करावी, अशी भूमिका कमिटीच्या वतीने मांडण्यात आली आहे.
नाशिकसह देशभरातील एचएएल कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 1:08 PM