ओझर टाऊनशिप : कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केलेले असताना एचएएल कारखाना मात्र सुरूच आहे. दरम्यान, कामगार संघटना आणि व्यवस्थापनामध्ये याबाबत चर्चा होऊन शनिवार, दि. १५ पासून २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
बुधवारी पहिल्या पाळीतील ओझर येथे राहणाऱ्या कामगारांना सुटल्यानंतर व दुसऱ्या पाळीसाठी कामावर येणाऱ्या कामगारांना पोलिसांनी रस्त्यातच अडविले होते. गुरुवारी फक्त ओझर टाऊनशिपमध्ये राहणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आले होते, तर इतर कामगारांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले होते.
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एचएएल कारखाना बंद ठेवावा, अशी मागणी कामगारांनी केली होती. ती मागणी एचएएल व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या समन्वय समितीने मान्य केली. जुलै महिन्यात १४ दिवस रोज साडेतीन तास जादा काम करून दिवस भरून देण्याच्या अटीवर १५ ते २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लाॅकडाऊन कालावधीत कामावर येण्यास प्रतिबंध असल्याने कामगारांना हे दिवस जादा काम करून दिवस भरून द्यावे लागू नये, यासाठी एचएएल व्यवस्थापनाशी लेखी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून कामगार संघटना प्रयत्नशील आहे.
सचिन ढोमसे, सरचिटणीस- एचएएल कामगार संघटना, नाशिक विभाग