ओझर टाऊनशिप : तोतया मिलिटरी अधिकारी संशयित भालचंद्र दिलीप उलगुडे (राख़ापोली, ता़चाकूर, जि़लातूर) याने हिंदुस्थान एरोनॅटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील सुरक्षारक्षकांच्या फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे तसेच एका कर्मचाऱ्याच्या भावास मिलिटरीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संशयित उलगुडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ओझर पोलिसांनी अटक केली आहे़ओझर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित भालचंद्र उलगुडे याने मिलिटरीमध्ये नोकरीस नसताना मिलिटरी अधिकारी असल्याचे बनावट कँटीनमार्क कार्ड तयार केले़ या कार्डचा उपयोग करून त्याने एचएएलचे सुरक्षा अधिकारी अर्पण चंचलकुमार दत्ता (२३, एअर फोर्स, ओझर), प्रशांतकुमार, एम़ डी़ जुगाले, सुरक्षा अधिकारी त्रिपाठी यांना दाखवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला़ यानंतर सातपूरच्या अशोकनगरमधील स्वप्नील बबन केदार यांना संशयित उलगुडे याने बनावट आर्मी आॅफिसरचे कार्ड दाखवून २ सप्टेंबर २०१५ ते २७ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत विश्वास संपादन केला़ तसेच केदार यांचा लहान भाऊ निखिल यास मिलिटरीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून तीन लाख रुपये घेतले़ मात्र, नोकरीस न लावता फसवणूक केली़ दत्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)
एचएएल कामगाराची फसवणूक
By admin | Published: March 02, 2016 11:03 PM