ओझर टाउनशिप : लढाऊ विमाननिर्मिती करणाऱ्या देशभरातील एकूण नऊ प्रभागांतील जवळपास वीस हजार कर्मचारी बेमुदत संपावर होते; मात्र सोमवारपासून (दि.१४) सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. २३) नाशिक विभागातील कामगारांनी संप स्थगित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे गुरुवारपासून (दि.२४) सर्व कामगार कामावर हजर होणार आहेत.गेल्या ३४ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतन करारासह इतर मागण्यांसाठी २० हजार कामगारांनी १४ आॅक्टोबरपासून बेमुदत संपाला सुरुवात केली होती. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने बंगळुरू विभागातील कामगार संघटनांना दिलेल्या आदेशानुसार सांगण्यात आले होते की, कोणत्याही प्रकारच्या कामकाजासह त्यांचा चालू संप थांबविण्यावर अंतरिम आदेश पारित केला होता. कामगार संघटनांनी उच्च व्यवस्थापनासोबत चर्चा करून चर्चेतून मार्ग काढावा. तसेच एचएएल आणि बंगळुरूमधील कार्यालये यांच्या दैनंदिन कार्यात आंदोलन किंवा विघटन करणे हे कोर्टाचा अवमान केल्यासारखे होईल. देशभरातील एचएएल कामगार संघटनांनी त्वरित संप मागे घेऊन काम पुन्हा सुरू करणे बंधनकारक आहे, असे आदेश पारित केले आहे. त्यामुळे नाशिक विभागाचे सर्व कामगार गुरुवारपासून कामावर हजर होणार आहेत.कर्नाटक हायकोर्टाने एचएएल कामगारांचा गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप मागे घेण्याचा आदेश दिल्यानंतर देशभरातील ८ प्रभागांतील कामगारांनी संप मागे घेतला आणि सर्वात शेवटी नाशिक प्रभागातील कामगारांचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारपासून कामगार कामावर हजर होणार आहेत. आम्ही आमच्या मागण्यावर ठाम असून, या मागण्यांसाठी वेगवेगळ्या मार्गाने लढा देणार आहोत.- सचिन ढोमसे, सरचिटणीस,एचएएल कामगार संघटना, नाशिक विभाग
एचएएल कामगारांचा संप स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:18 AM