नाशिक : गृहोपयोगी वस्तूंचे वाण लुटून हळदी-कुंकवाचा सोहळा करणाºया महिलांना यंदा जीएसटीमुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. लॅस्टिक व इतर गृहोपयोगी वस्तूंचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. वर्षातून एकदाच मिळणारी संक्रांतीची संधी न सोडता महिला हटके वाण देण्यासाठी बाजारात वस्तूंचा शोध घेत असून, गरजेप्रमाणे १ ते ५ डझन अशा प्रमाणात वस्तूंची खरेदी करत आहेत. यंदा बाजारात पारंपरिक वस्तूंबरोबरच नवनवीन वस्तूही दाखल झाल्या असून अशा हटके, उपयोगी आणि हायटेक वस्तू घेण्यावर महिला भर देत आहेत. प्लॅस्टिकच्या डब्या, गाळणी, चमचे यांची जागा आता हेडफोन, मोबाइल कव्हर, मोबाइल स्टॅन्ड, मेमरी कार्ड, पेनड्राईव्ह, पॉवरबॅँक, चित्रपट, गाण्यांच्या सीडीज, डिव्हिडीज आदी हायटेक अॅक्सेसरीजने घेतली असून आधुनिक जगतातील आधुनिक नारी आता संक्रांतीचे वाण लुटताना हायटेक झाल्याचे दिसून येत आहे. वाणातले हायटेक आयटम घाऊक प्रमाणात खरेदी करण्यासाठी होलसेल मार्केटची मदत घेतली जात असून, काही महिलांनी तर आॅनलाइन आॅर्डर देऊन वस्तू मागविण्यावरही भर दिलेला दिसून येत आहे. यंदा महिलांचा वैविध्यपूर्ण वस्तूंची भेट देण्यावर भर दिसून येत आहे. चमचा, पळ्या, उचटणे, काचेचे, स्टील व प्लॅस्टिकचे बाऊल सेट, वाट्या, डिश, स्टीलच्या किसण्या, रोटी प्लेट, भाज्या, फुलांसाठीच्या प्लॅस्टिकच्या परड्या, देवघरात उपयोगी अशा नक्षीदार प्लॅस्टिकच्या प्लेट, चहाच्या गाळण्या, पावशेर, आतपावच्या मापात साखर, चहा पावडर, केशतेलाच्या बाटल्या, लिपगार्ड, व्हॅसलीन, मॉश्चरायझर्स, कोल्डक्रीम बॉटल, शॅम्पू सॅशे, टाल्कम पावडर, टिकल्या, साडीपिना, पोथ्या, हातरुमाल, हॅँडबॅग, मनीपर्स या वस्तूही बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या असून, त्या १२० ते ४०० रुपये डझन या दरात उपलब्ध होत आहेत. इतरांपेक्षा आपले वाण हटके, उपयुक्त व आकर्षक कसे ठरेल याचा विचार गृहिणींकडून प्राधान्याने केला जात आहे. हायटेक वस्तूंना प्राधान्य अॅक्सेसरीजबरोबरच मोड्युलर किचनला शोभतील आणि गृहिणींचे काम सोपे करतील, अशा वस्तूंचाही यंदा वाणात समावेश आहे. त्यात फ्रीजसेफ कंटेरर्स, मायक्रोवेव्ह सेफ प्लॅस्टिकचे बाऊल, मायक्रोवेव्ह सेफ मग, पेटजार्स, स्लायसर, रोटी प्लेट, फ्रुट कटर, लसूण सोलणी आदींचा समावेश असून, बºयाच महिला मैत्रिणींची गरज ओळखून व वाण रिपीट होणार नाही याची काळजी घेत नवनवीन प्रकारांचा शोध आहे. महिला ग्रुपमध्ये हेडफोन, मेमरीकार्ड, मोबाइल स्टॅन्ड अशा वस्तू देण्याचेच यंदा नियोजन करीत आहे. त्यामुळे यंदाचे संक्रांतीचे हळदी-कुंकू हे हायटेक असणार आहे.
हळदी-कुंकू समारंभ : वाणाला जीएसटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:41 PM