नाशिक शहर बस वाहतूक ही तोट्यातच चालणार हे गृहीत धरण्यात आले असले तरी तो कमी व्हावा यासाठी पर्यायी उत्पन्नाची साधने शोधली जात आहेत. त्यातच मुख्य धावणाऱ्या बसला ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे, त्या मार्गालाच प्राधान्य दिले जात आहे. सध्या कोरोनामुळे असलेले निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असला तरी अद्याप तो अपेक्षेनुसार नाही. महापालिकेचे पंचवटीत तपोवन आणि नाशिकरोड असे दोन डेपो असून, त्यातील तपोवन डेपोतून निघालेल्या बसला काही अंतरापर्यंत प्रतिसाद मिळत नाही. दररोज सरसरी एकच प्रवासी इतका भार आहे.
महापालिकेला प्रतिकिलो मीटर ठेकेदारला खर्च द्यावा लागतो. मात्र उत्पन्न मिळत नसल्याने तपोवनऐवजी निम्म्या बस निमाणी थांब्यावरून सोडण्याचे ठरविण्यात आल्यामुळे तपोवनात जाणे आणि तेथून परत रिकामे येण्यामुळे होणारा तोटा कमी झाला असून, उलट निमाणीमधून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासीदेखील उपलब्ध होत आहेत.
सध्या सीटीलिंकच्या ५२ बस शहरात धावत आहेत. सध्याच्या प्रतिदिन उत्पन्नात तपोवन आगाराचे एक लाख ६९ हजार ३७० रुपये उत्पन्न असून, नाशिकरोड आगाराचे एक लाख ४७ हजार ६८० रुपये उत्पन्न मिळत आहे. साेमवारपासून निम्म्या बस निमाणीत थांबू लागल्याने महापालिकेचा तोटा कमी होऊन उत्पन्नात भर पडली.
इन्फो...
प्रतिदिन पंधरा हजारांचा टप्पा
नाशिक महापालिकेच्या बससेवेला रविवारी (दि.८) एक महिना पूर्ण होत असताना प्रवासीसंख्येने प्रतिदिन १५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी (दि.९) आजवरची सर्वाधिक १५ हजार ५३१ प्रवासीसंख्या गाठली गेली. तसेच साेमवारी तीन लाख २० हजार १२५ रुपयांचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्नही मिळाले.