मनोज देवरे,
कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनीच्या गडावरील अर्थचक्र श्रावणमासामध्ये देखील मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ह्यलॉकह्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट केव्हा दूर होईल आणि देवीभक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी खुले होईल, याची आस लागली आहे. पहिल्या पायरीवर दर्शन सुविधा केली असल्यामुळे थोडेफार आर्थिक चलन सुरू झाले आहे.
गडावर कोणतेही इतर उपजीविकेचे साधन नसल्याने अर्थचक्र पूर्णत: थांबले असून, वर्षभरातील दोन यात्रोत्सव व दैनंदिन येणाऱ्या भाविकांमुळे अनेकांच्या हाताला येथे काम मिळते. फूल, प्रसाद, खण-नारळ विक्रेता, पार्किंग, हॉटेल व्यवसाय करणाऱ्या अनेकांसाठी सप्तशृंगी गड म्हणजे पोटापाण्याची सोय आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू झाला व गडावरील व्यावसायिकांचे जगणेच हे दुखणे झाले. सप्तशृंगी गडावर राहणाऱ्या प्रत्येक घटकाची दिनचर्या मंदिर व भाविकांवरच अवलंबून आहे. इथे ना शेती ना अन्य दुसरा व्यवसाय करण्यास वाव. त्यामुळे श्रावणमासात देखील गडावर पाहिजे तसा उत्साह नव्हता.
कधी एकदाचा कोरोना जाईल आणि आई भगवतीचे दर्शन सुरू होऊन मंदिर सर्वांसाठी खुले होईल आणि भाविकांची वर्दळ सुरू होईल याकडे येथील व्यावसायिकांचे डोळे लागले आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी २०२१ मध्ये मंदिर सुरू असल्यामुळे सप्तशृंगी गडावरील अर्थव्यवस्था थोडीफार सुधारली होती.
२४ मार्च २०२१ पासून मंदिर बंद झाल्यामुळे श्रावणमासात विशेष उत्पन्नात विशेष वाढ होत नाही. ट्रस्टला आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ८.७५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले; मात्र ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात मंदिर देवीभक्तांसाठी खुले केल्यावर उत्पन्न निम्म्यावर आले आहे. देवी मंदिरातून उपलब्ध होणारा निधी व देणगीदारांकडून घटलेल्या देणगी उत्पन्नामुळे सप्तशृंगी गडावरील नियोजित विकासकामे तूर्तास थांबविण्यात आले आहे.