नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या तुलनेत बुधवारी (दि. ५) सुमारे दीडपट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात २७९५ इतक्या रुग्णांची वाढ झाली असून ४,०६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४१ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३,८२५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १,४२९ तर नाशिक ग्रामीणला १,२९८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १७ व जिल्हाबाह्य ५१ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १०, ग्रामीणला ३० , मालेगाव मनपात १ असा एकूण ४१ जणांचा बळी गेला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास होती. त्यात गत आठवड्याच्या उत्तरार्धात काहीशी घट झाली होती. मात्र, गत तीन दिवस पुन्हा मृतांच्या आकड्यात काहीशी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ८९ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ती ८९.५० टक्क्यांवर पाेहाेचली आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९१.५८ टक्के, नाशिक शहर ९१.६२, नाशिक ग्रामीण ८६.४३ तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८४.४१ टक्क्यांवर पाेहोचला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल ५ हजारांवर
जिल्ह्यात प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ५,३७० वर पोहोचलेली आहे. त्यात सर्वाधिक ३,३९३ इतके अहवाल ग्रामीण भागाचे प्रलंबित असून, १,५७७ अहवाल नाशिक शहराचे तर मालेगाव मनपाचे ४०० असे एकूण ५,३७० अहवाल प्रलंबित आहेत.