नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचा हा संपूर्ण परिसर गोसावी सरांनी संमेलनासाठी उपलब्ध करून दिल्याने साहित्य संमेलनाचे निम्मे काम फत्ते झाले आहे. आता संमेलन आयोजनाचे अर्धेच काम बाकी असून आपण सर्व नाशिककर मिळून साहित्यिक आणि रसिकांचे यथोचित आदरातिथ्य करून संमेलन पार पाडू, असा विश्वास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. कविवर्य कुसुमाग्रज आणि वसंत कानेटकर यांचे वास्तव्य लाभलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार आणि यशस्वी होईल, असा विश्वास गोएसो कॅम्पसच्या पाहणीनंतर भुजबळ यांनी व्यक्त केला.
साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी रविवारी सकाळी भुजबळ फार्म कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासोबत पाहणी दौरा केला. कॅम्पसमधील सोयी-सुविधांच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत समाधान व्यक्त केले. तसेच संमेलनाच्या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल, असेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिककर म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संमेलन सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येऊन पूर्णवेळ या ठिकाणी ते काम बघतील असेही त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनासाठी योग्य जागेची निवड करण्यात आलेली आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील, याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या. यावेळी गोखले एज्युकेशनचे प्रमुख प्राचार्य मो. स. गोसावी सर, शैलेश गोसावी, प्राचार्य राम कुलकर्णी, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, लक्ष्मण सावजी, लोकेश शेवडे, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे, योगेश कमोद, सुनील भुरे, किरण समेळ आदी उपस्थित होते.
इन्फो
सहस्त्रचंद्र दर्शनाचा विषयच नव्हता
शरद पवार यांचे सहस्त्रचंद्र दर्शन या संमेलनाच्या माध्यमातून करणे किंवा त्या विचारातून संमेलन नाशिकला भरवणे असा काही विषयच नव्हता. साहित्य महामंडळ काही करणार असेल, तर तो त्यांचा विषय असून त्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महामंडळ निर्णय घेईल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.