मातोरी : गावात गेल्या आठ महिन्यांपासून नूतन ग्रामपंचायत वास्तूचे काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे काम रखडल्याचा ग्रामपंचायत सदस्यांनी आरोप केला आहे.मातोरी गावाला ग्रामपंचायत कार्यालयाची जागा ही अत्यंत लहान असल्याने गावाला नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात यावे, यासाठी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. तसेच अपुरी जागा असल्याने तेथील कामकाजावर परिणाम होत असल्याने २०१७ शासनाने नवीन जागेत कार्यालय बांधण्यास परवानगी दिली. त्यानुसार गावातील जुनी पाण्याची टाकी असलेल्या जागेत कामकाजास सुरुवात झाली, पण ठेकेदाराने वारंवार काहीना काही कारणे देत कामास विलंब लावला गेला. या विषयी गावकऱ्यांनी अनेकदा ठेकेदारास जाब विचारला असता उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आल्याचे सांगण्यात आले, आता गेल्या आठ महिन्यांपासून इमारतीचे काम तसेच पडून राहिले असून, ठेकेदार कामाला टाळाटाळ करत असून, या कामाचा ठेका काढून ग्रामपंचायतने दुसºयाला द्यावा किंवा काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, तर ग्रामपंचायत सदस्यांनी ठेकेदारास दोषी ठरवत ठेकेदाराने कामात निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप केला आहे. ग्रामपंचायतचे अर्धवट कामाची वास्तू ही मद्यपी व पत्ते खेळण्याची जागा झाली असून, प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
मातोरी ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:22 AM