नाशिक : अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २०२० पासून सुवर्ण दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर केली असून, हॉलमार्क नोंदणीसाठी व्यावसायिकांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. हॉलमार्किंगनुसार सराफ व्यावसायिकांना केवळ २२, १८, १४ कॅरेटच्या दागिन्यांची विक्री करता येणार असून, ग्राहकांना शुद्धतेची हमी मिळणार असल्याने नाशिक सराफ असोसिएशनने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.सराफ असोसिएशनने हॉलमार्किंगचे स्वागत केले असले तरी ही प्रणाली यशस्वी करण्यासाठी अनेक अडचणी असून, सरकारने प्रथम या अडचणी दूर करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सराफांकडून उमटत आहे. जिल्ह्यात सुमारे ७ हजार ८०० छोटे-मोठे सराफी व्यावसायिक आहेत व यातील जवळपास सहा हजार व्यावसायिक ग्रामीण भागात आहेत. अशा व्यावसायिकांसाठी १०० टक्के हॉलमार्किंगची पूर्तता करण्याचे आव्हान असणार आहे.जिल्ह्यातील बहुतांश ग्राहक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करताना २४ कॅरेट म्हणजेच चोख सोन्याचे दागिने खरेदी करतात. अशा ग्राहकांसाठी हॉलमार्किंगचा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांची निराशा होण्याची भीती आहे. जिल्ह्यात सराफी व्यावसायिकांच्या तुलनेत केवळ तीन हॉलमार्किंग सेंटर तीन आहे. त्यामुळे दागिन्यांच्या मागणीप्रमाणे हॉलमार्किंग होणे शक्य नसल्याने ग्राहकांच्या नाराजीसोबतच व्यावसायिकांचे आर्थिक समीकरणही बिघडण्याचा धोका आहे. ग्रामीण भागातील व्यावसायिकांना हॉलमार्किंग सेंटर्सपर्यंत प्रवास करताना दागिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे हॉलमार्किंग रजिस्ट्रेशन प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्याने छोटे व्यावसायिक व कारागिरांना नोंदणी करणे आर्थिकदृष्ट्या अवघड असल्याने यासंदर्भातील त्रुटींची पूर्तता करून सरकारने हॉलमार्किंग सक्तीचे करावे, अशी मागणी नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने केली आहे.सराफांच्या मागण्यानाशिक सराफ असोसिएशनने हॉलमार्किंगच्या निर्णयासंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून २४ कॅरेट व टिकाऊ दृष्टिकोनातून २० कॅरेट दागिन्यांचा समावेश करण्याची मागणी करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच नाशिक शहरात किमान १५ हॉलमार्किंग सेंटर्स होत नाही तोपर्यंत सक्ती करू नये, नोंदणी शुल्क व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीवर अवलंबून असावे. असे झाल्यास सर्व छोटे-मोठे व्यापारी हॉलमार्किंगप्रणाली १०० टक्के यशस्वी होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतील, असे मत नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी व्यक्त केले आहे.
हॉलमार्किंग सक्तीचे; सराफांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:09 AM