नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या १२२ पैकी ३३ जागांवर गदा आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या जागा खुल्या प्रवर्गात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुल्या जागा वाढल्याने बहुतांश नगरसेवकांना आता खुल्या गटातच सामना करावा लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६१ प्रभागात एकूण १२२ नगरसेवक निर्वाचित झाले. यात अनुसूचित जमातींसाठी सात टक्के तर अनुसूचित जातींसाठी १३ टक्के आरक्षण होते. ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण असून त्यामुळे १२२ पैकी ३३ जागांवर ओबीसी उमेदवार निवडून आले होते. यात सतरा महिला उमेदवार याच प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. मात्र, आता हे आरक्षण रद्द झाल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्ग नसेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणदेखील पन्नास टक्क्यांच्या पुढे जात असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यास नकार दिला. त्यामुळे सध्या राजकीय पटलावर वाद सुरू झाले आहेत. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाचविण्यासाठी राजकीय पटलावर प्रयत्न सुरू झाले असले तरी सरकार आता त्याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. परंतु समजा त्यावर काहीच तोडगा निघाला नाही तर मात्र आगामी निवडणुकांमध्ये या ३३ जागा खुल्या प्रवर्गासाठी राहतील, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास निवडणुकीतील चुरस आणखी वाढेल असे सांगितले जात आहे.
इन्फो...
महापालिकेत ओबीसी राखीव गटातून निवडून आलेले नगरसेवक
प्रभाग १ क- गणेश गिते, २ क- उद्धव निमसे, ३ अ- मच्छिंद्र सानप, ४ क- जगदीश पाटील, ५ अ- कमलेश बोडके, ६ ब- सुनीता पिंगळे, ७ अ- अजय बाेरस्ते, ८ क- संतोष गायकवाड, ९ ब- हेमलता कांडेकर, १० अ- माधुरी बोलकर, ११ क- सलीम शेख, १२ ब- समीर कांबळे, १३ अ- वत्सला खैरे, १३ ब- गजानन शेलार १४ ब- समिना मेमन, १५ अ- अर्चना थेारात, १६ क- अनिल ताजनपुरे, १७ ब- मंगला आढाव- १८ ब- रंजना बोराडे, १९ ब- जयश्री खर्जुल, २० ब- डॉ. सीमा ताजणे, २१ ब- रमेश धोंगडे, २२ ब- (कै.) सत्यभामा गाडेकर, २३ ब- शाहीन मिर्झा, २४ अ- (कै.) कल्पना पांडे, २४ ब- राजेंद्र महाले, २५ अ- सुधाकर बडगुजर, २६ अ- मधुकर जाधव, २७ क- किरण गामणे, २८ अ- डी. जी. सूर्यवंशी, २९ अ- छाया देवांग, ३० ब- सुप्रिया खोडे, ३१ ब- पुष्पा आव्हाड,