नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने नियमबाह्य आणि अनधिकृत वापराबद्दल शहरातील १६६ मंगल कार्यालये आणि लॉन्सला नोटिसा बजावल्यानंतर सुमारे सव्वाशेहून अधिक मंगल कार्यालये व लॉन्सवर लवकरच हातोडा पडण्याची शक्यता आहे. अनधिकृतपणे चालविली जाणारी मंगल कार्यालये व लॉन्सच्या नियमितीकरणासाठी शासनाच्या धोरणानुसार ३१ मे २०१८ पर्यंत मुदत आहे परंतु, त्यापूर्वीच कारवाई करण्यासंबंधीची चाचपणी महापालिकेमार्फत सुरू करण्यात आल्याने मंगल कार्यालये व लॉन्सचालकांत खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने स्थायी समितीने केलेल्या आदेशानुसार, चार महिन्यांपूर्वी शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स यांचे सर्वेक्षण केले असता सुमारे १६६ मंगल कार्यालये, लॉन्स हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेने या संबंधिताना त्यानुसार नोटिसा बजावल्या आहेत. शासनाच्या अनधिकृत बांधकाम धोरणानुसार, संबंधित मंगल कार्यालये व लॉन्सचालक यांना आपले अनधिकृत बांधकाम दंड भरून नियमित करता येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच ते ४० लाखांपर्यंतचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. त्यातून महापालिकेला सुमारे ३५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, कंपाउंडिंग चार्जेस भरून सदर बांधकामाच्या नियमितीकरणाला आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कंपाउंडिंग चार्जेस हे अवाजवी असल्याने ते भरणेही मुश्किल असल्याचे सांगितले जात आहे. दंडापोटी लाखो रुपये महापालिकेला मोजण्यापेक्षा स्वत:हून बांधकाम काढून घेणे अनेकांनी पसंत केले आहे.विवाह सोहळे येणार अडचणीतसध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. मे महिन्यात १३ तारीख शेवटची तिथी आहे. त्यानंतर थेट जून महिन्यात पुन्हा १८ तारखेपासून विवाह मुहूर्त आहेत. जून महिन्यात १८, २३, २८, २९ तर जुलै महिन्यात १, २, ५, ६, ७, १०, १५ तारखेपर्यंत विवाह मुहूर्त आहेत. शहरातील जवळपास सर्वच मंगल कार्यालये व लॉन्सच्या तारखा विवाह सोहळ्यासाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यात, महापालिकेने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सवर कारवाईचा बडगा उगारल्यास विवाह सोहळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या नोटिशांमुळे मात्र, मंगल कार्यालये व लॉन्सचालकांच्या उरात धडकी भरली असून, काहींनी स्वत:हून बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी पुढील तारखा स्वीकारणे बंद केल्याचे समजते.
हातोडा पडणार : मनपाने बजावल्या नोटिसा मंगल कार्यालये, लॉन्स रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:32 AM
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने नियमबाह्य आणि अनधिकृत वापराबद्दल शहरातील १६६ मंगल कार्यालये आणि लॉन्सला नोटिसा बजावल्यानंतर सुमारे सव्वाशेहून अधिक मंगल कार्यालये व लॉन्सवर लवकरच हातोडा पडण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे मंगल कार्यालये व लॉन्सचालकांत खळबळ उडालीअनधिकृत बांधकाम दंड भरून नियमित करता येणार