नाशिक (सुयोग जोशी) : महापालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबविली जात असून, सोमवारी (दि. १) कॉलेजराेड, महात्मानगरसारख्या उच्चभ्रू परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले.
काही ठिकाणी संबंधित व्यावासायिक, महिलांनी विरोध केला, मात्र पथकाने कारवाई केली. त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉलेजरोड या उच्चभ्रू परिसरात व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्यावर रहदारी करणे अवघड झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत कॉलेजरोडवरील उडपी सेंटर, स्कायलाईन बार, अवैध बार, हुक्का पार्लर, कारभारी नॉनव्हेज दरबार, कॉफी स्ट्रीट, डॉमिनोज पिझ्झा, माय उडपी स्पाईस यासारख्या हॉटेलवर बुलडोझर फिरविण्यात आला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. या कारवाईत अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर, विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, समीर रकटे यांचे पथक सहभागी झाले होते. सहा जेसीबी, दहा अतिक्रमणची वाहने, मनपाचा १०० ते १५० जणांचा फौजफाटा शिवाय मोठ्या पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आली.