सुयोग जोशी, नाशिक: अतिक्रमण काढण्याबाबत कोणत्याही आदेशाविना आलेले महापालिकेचे अधिकारी, त्याला शिवसैनिकांनी केलेला विरोध, त्यावेळी जमलेला प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा न्यायायालयाचे आदेश अशा हायहोल्टेज ड्राम्यानंतर मुंबई नाका येथील माजी आमदार वसंत गिते यांच्या संपर्क कार्यालयाच्या अतिक्रमणांवर शनिवारी बुलडोझर फिरविण्यात आला. दुसरीकडे ही कारवाई राजकीय सुडापोटीच केल्याचा आरोप वसंत गिते यांनी केला आहे.
शनिवारी (दि.२९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुंबई नाका येथील वसंत गीते यांच्या कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेेचे पथक येणार अशी माहिती कळताच मुंबई नाका परिसरात गीते यांच्या समर्थक, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तेथे जमून त्यांनी गीते यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी द्यायला सुरूवात केली. प्रारंभी तेथे पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला. त्यानंतर महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथकही दाखल झाले. त्यावेळी मात्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
वसंत गिते यांचे पूत्र प्रथमेश गिते हे अग्रभागी होते. मनपाचे अधिकारी दाखल होताच गिते यांनी त्यांना अतिक्रमण काढण्याबाबतचा आदेश दाखविण्याची विनंती केली. मात्र त्यांच्याकडे कोणताही आदेश नसल्याने त्यांना निरूत्तर व्हावे लागले. आम्ही केवळ मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये कारवाई करण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. मात्र त्यानंतर गिते यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी अतिक्रमण काढण्यास त्याला कडाडून विरोध केला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुन्हा महापालिकेचे उपायुक्त मयूर पाटील,पूर्वचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी न्यायालयाचा आदेश आणल्यानंतर अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. उर्वरित राहिलेली अतिक्रमणे पावसामुळे थांबविण्यात आली असून ती आम्ही स्वत:हून काढणार असल्याचे गीते यांच्या समर्थकांनी मनपा अतिक्रमण पथकाला सांगितल्यानंतर सर्वजण रवाना झाले.