नाशिक : महापालिकेने सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार दुकाने हटविण्यासाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला असून, येथील सुमारे साडेतीनशे दुकाने हटविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता सोमवारी (दि.१९) या दुकानांवर हातोडा पडणे अटळ असल्याचे मानले जात आहे.अंबड लिंक रोडवर भंगार दुकानांचा प्रश्न अनेक वर्षांपासून गाजत आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात अनेक वर्षे प्रकरण होते. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरदेखील कारवाईस टाळाटाळ होत होती. दरम्यान, महापालिकेने २०१७ मध्ये या भागात धडक मोहीम राबविली आणि सुमारे ७५४ अतिक्रमण भूईसपाट केली. त्यानंतर पुन्हा अतिक्रमणे उभी राहिली. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेने कारवाई केली आणि अतिक्रमणे हटविली होती. आता याठिकाणी साडेतीनशे दुकाने पुन्हा उभी राहिली आहेत.महापालिकेने हे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधितांना ४८ तासांत अतिक्रमणे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. आता शनिवारी (दि. १७) जाहीर प्रकटनाद्वारे २४ तासांची मुदत देण्यात येणार आहे. तर येत्या सोमवारी (दि.१९) ही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
भंगार दुकानांवर पडणार हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 1:13 AM