येवला : तालुक्यातील पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू झाली असून, महिला पाण्यासाठी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील सायगाव महादेववाडी येथील आदिवासी महिलांनी पिण्याचे पाणीसाठी तहसील कार्यालवर हंडा मोर्चा काढला. तालुक्यातील सायगाव महादेववाडी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याचे पाण्याच्या टँकरची मागणी करूनसुद्धा पाण्याचे टँकर चालू होत नसल्याने संतप्त आदिवासी महिलांनी तहसील कार्यालवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. महादेववाडीत पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली असून, या आदिवासी महिलांना पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली असून, एकच हातपंप असून त्यालाही कमी पाणी आहे. प्रशासनामार्फत एकही टँकर सुरू न झाल्याने संतप्त महिलांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. सायगावपासून दोन किमी अंतरावर असलेल्या ४०० लोकवस्तीच्या महादेववाडीच्या पाणीप्रश्नाने उग्ररूप धारण केले आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी पाणी टँकरच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत पाणी टँकर आहे. महादेववाडीच्या आदिवासी महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत असून, कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा तहसीलवर हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:48 AM