नाशिक : मालक सलूनमध्ये गेल्याची संधी साधत १० दिवसांपूर्वी ड्रायव्हरने कारमधील १५ लाखांची रोकड घेऊन कार सोडून पोबारा केला होता. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी तपासाला गती दिली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित ड्रायव्हरचे लोकेशन शोधत शिताफीने गुन्हे शोध पथकाने सोलापूर गाठून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी १२ लाख २५ हजारांच्या रोकडसह चोरीच्या पैशांद्वारे खरेदी केलेला आयफोन, सोनसाखळी असा सुमारे एकूण १३ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल संशयिताकडून हस्तगत केला आहे.
बारा दिवसांपूर्वी रविवारी (दि. ३) फिर्यादी अली गुलामहुसेन सुराणी (रा. ग्रीन लॉन्स, शिंगाडा तलाव) हे त्यांच्या वाहनचालकासमवेत कारने कॅनडा कॉर्नर येथील एका सलूनमध्ये आले होते. इनोव्हा कारचा चालक म्हणून नोकरीस असलेला संशयित विकास ऊर्फ विक्की उत्तमराव मोकासे याने सुराणी हे सलूनमध्ये गेले असता कारमधील १५ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला. सुराणी जेव्हा कारजवळ आले तेव्हा त्यांना चालक व बॅग दोन्ही नसल्याचे लक्षात आले. त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. तक्रारीवरुन संशयित विकासविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मच्छींद्र कोल्हे यांनी हवालदार मुकेश राजपूत, नाईक नितीन थेटे, नाझी शेख यांचे पथक घेऊन सोलापूर गाठले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच काही गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळविण्याचा पथकाने तेथे प्रयत्न केला, मात्र संशयित विकास हा गुंटुंर आंध्रप्रदेशमध्ये असल्याचे समजले. यानंतर पथकाने कौशल्य वापरून विकास यास पुन्हा सोलापूरमध्ये येण्यास भाग पाडले. तेथे तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी आला असता पथकाने शिताफीने संशयित विकासच्या मुसक्या बांधल्या. त्याची कसून झडती घेत चौकशी केली असता त्याने सव्वाबारा लाखांच्या रोकडबत माहिती पोलिसांना सांगितली. यानुसार पथकाने रोकड जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक अशोक काकविपुरे हे करीत आहेत.
-इन्फो--
सातत्याने जिल्हे बदलत गाठले आंध्रप्रदेश
संशयित विकास हा नाशिक सोडल्यानंतर सातत्याने वेगाने जिल्हे बदलत होता. त्यामुळे त्याचे स्थिर लोकेशन तांत्रिक विश्लेषण शाखेलाही मिळत नव्हते. धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर बंगळुरूमधून थेट त्याने महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेश गाठले. हैदराबाद येथून गुंटुर गाठले होते, असे जाधव यांनी सांगितले.