नाशिक : मनपाच्या वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे यास बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीपचा मावसभाऊ व जवळचा मित्र बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के यास पोलिसांनी प्राप्त पुराव्यांच्याअधारे बुधवारी अटक केली.
संशयित पती संदीप वाजेची चौदा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने बुधवारी मध्यवर्ती कारागृहात वाजेची रवानगी केली. मागील बारा दिवसांपासून पोलिसांनी वाजेची कसून चौकशी करत या गुन्ह्यात अजून त्याच्यासोबत किती साथीदार होते याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्याअधारे हाती आलेल्या पुराव्यांवरुन संशयितांची धरपकड करत कसून चौकशी केली. पोलिसांना वाजेच्या दोघा संशयित मित्रांवर संशय होता. यापैकी म्हस्केविरुद्ध प्राप्त पुराव्यांवरुन पोलिसांनी सुवर्णा वाजे खूनप्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरुन अटक केली. म्हस्के यास गुरुवारी (दि.१७) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. सुवर्णा वाजे यांनी लिहिलेले पत्र आणि चॅटिंगच्या आधारे डॉ. वाजेंचा खून संशयित पती संदीप वाजे यानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस कोठडीत तपासाकरिता वाजे याने फारसे सहकार्य पोलिसांना केले नाही. त्याने अद्यापही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यास न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.
त्यानंतर सायंकाळी वाडीवऱ्हे पोलिसांनी दुसरा संशयित बाळासाहेब म्हस्के याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले.