नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास परगावाहून आलेल्या एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्याजवळील मोबाइल हिसकावून दोघा लुटारूंनी पलायन केले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघांपैकी एक सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार भूषण श्रावण शेलार (२२,रा.मेहरधाम, पेठ रोड) हा युवक शनिशिंगणापूर येथून देवदर्शन आटोपून पंचवटी येथे मध्यरात्री उतरला हाेता. पेठ रोडवरील फुलेनगर येथे शेलार त्यांच्या मामाच्या घरी पायी जात होते. यावेळी दोघा लुटारूंनी त्यांची वाट रोखली. एका इसमाने त्यांच्याजवळील कोयता भूषणच्या मानेवर उगारून दुसऱ्याने त्याचे हात पकडून घेत खिशात ठेवलेला मोबाइल बळजबरीने हिसकावून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत रात्रगस्तीवरील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शोध पथक यांना या गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्याचे आदेश दिले होते.
पीटर मोबाइलवरील रात्रगस्तीचे गस्तीपथक हे फुलेनगर पाटाजवळ गस्तीवर असताना गुन्ह्यातील संशयितांच्या वर्णनानुसार दोन युवक संशयास्पदरीत्या वावरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. संशयित सराईत गुन्हेगार समाधान सुरेश वाघ (२४, रा. फुलेनगर), जय संतोष खरात (१९, रा. फुलेनगर) अशी त्यांनी नावे सांगितली. सराईत गुन्हेगार समाधान याने त्याच्या साथीदारांसोबत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पंचवटी पोलीस ठाण्याच्या यादीवर संशयित समाधान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे असे एकूण १२ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.