कसबे सुकेणे : कांदा व कापसाला मिळत असलेला अल्पभाव, कमी प्रमाणात होणारी खरेदी व व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा याचा निषेध व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता निफाड तालुक्यातील थेरगाव येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व शेतकऱ्यांनी मूठभर कापूस जाळा आंदोलन छेडले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरचे आंदोलन गर्दी न करता करण्यात आले. जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनामुळे सतत बंद असतात.शासन व व्यापारीविरोधात राज्यव्यापी मूठभर कापूस जाळा आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेने दिला होता. शासनाने शेतकºयांनी घरात साठवलेला कापूस तिन्ही ग्रेड प्रतीचा खरेदी करावा या प्रमुख मागणीसाठी हे मूठभर कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. खुल्या मार्केटमध्ये कापसाचे दर पडल्यामुळे व्यापारीवर्ग फारच कमी दरात कापूस खरेदी करून शेतकºयांची अडवणूक करत आहेत.जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनामुळे सतत बंद असतात. त्यामुळे कांद्याचे मार्केट ४०० रुपये प्रतिक्विंटल इतका खाली आलेला आहे. शासनाने प्रत्येक बाजार समितीमध्ये किमान दोन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणीही शेतकरी संघटनेने यावेळी केली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, केदू बोराडे, दगू गवारे, तानाजी बोराडे, विष्णू बोराडे, किरण गवारे, व्यंकटेश गवारे, दिलीप बर्वे, संजय काळे, ज्ञानेश्वर चौधरी, संजय पारधे, तुकाराम उघडे आदी उपस्थित होते.-----------शेतक-यांचा कांदा दोन हजार रुपये क्विंटल दराने शासनाने खरेदी करावा किंवा भावांतर योजना राबवावी या मागणीसाठी हे मूठभर कापूस जाळा आंदोलन होत आहे.- अर्जुन बोराडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
‘मूठभर कापूस जाळा’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 8:28 PM