शहरात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगसह सार्वजनिक ठिकाणांहून दुचाकीचोरीचा सपाटा लावल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पोलीस यंत्रणा चोरट्यांवर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.
या भागात सर्वाधिक धोका !
- शहरातील सरकारवाडा, मुंबईनाका, भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत.
-शहरातून दुचाकीचोरीची प्रमाण एवढे वाढले आहे, तरी चोरट्यांकडून आठवडाभरात सरासरी डझनभरांहून अधिक दुचाकी लांबविल्या जात आहेत.
- गजबजलेल्या मध्यवर्ती भागातून चोरट्यांकडून नाशिककरांच्या दुचाकी सहजरीत्या गायब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
- शहरातील मुख्य वर्दळीचा परिसर सरकारवाडा पोलीस ठाण्यासह शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये, जिल्हा शासकीय रुग्णालय, न्यायालये, बसस्थानके, बाजारपेठांच्या भागातही दुचाकीचोरीच्या घटना घटत आहे.
-नाशिकरोड, इंदिरानगर, सिडको, सातपूरसोबतच पंचवटी व आडगावसारख्या उपनगरांमध्येही दुचाकीचोरीच्या घटना वाढल्या असून, या भागात दुचाकीकडे दुर्लक्ष करणे अथवा अधिक वेळेसाठी दुचाकी उभी करून ठेवणे धोक्याचे ठरत आहे.
----
चोरटे सुसाट
शहरातील विविध भागांत रोज तीन ते चार दुचाकीचोरीला जात असताना पोलीस यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याने चोरट्यांकडून दुचाकीचोरीचा सपाटा सुरूच आहे. पोलिसांचा कोणताही वचक
चोरट्यांवर उरलेला नाही.
--
दुचाकी सापडण्याचे प्रमाण अत्यल्प
नाशिक शहरात रोज घडणाऱ्या दुचाकीचोरीच्या घटनांच्या तुलनेत पोलिसांकडून चोरट्यांवर कारवाई करून पकडण्यात येणाऱ्या दुचाकींचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना त्यांची चोरीला गेलेली वाहने पुन्हा मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने शहर पोलीस सध्या टीकेचे लक्ष होताना दिसून येत आहे.