नाशिक: जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी (दि.५) काढण्यात आलेल्या सोडतीनुसार १८ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती, २ अनुसूचित जाती, ९ सर्वसाधारण तर ५ ओबीसी या प्रमाणे ३४ ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. दरम्यान, काही ग्रामपंचायतींमध्ये सलग दुसऱ्यांदा महिलांसाठी आरक्षण दिल्याने तेथे दुसऱ्यांना महिला राज येणार आहे.
पंचायत समिती येथे सकाळी दहा वाजता महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. तालुक्यातील ३४ राखीव ठरलेल्या ग्रामपंचायतींचे प्रवर्गानिहाय आरक्षण काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. चिठ्ठी पद्धतीने राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत १८ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती, २ अनुसूचित जाती, ९ सर्वसाधारण तर ५ ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित ठरल्या आहेत. ओबीसी, सर्वसाधारणसह अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अन् महिलांसाठी राखीव करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींची मर्यादित संख्या असल्याने त्यांचीही सोडत काढण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी सलग दुसऱ्यांना महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाले. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी वर्षा मिना यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. त्यामुळे महिला सरपंचपदाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यंदा सदस्यांमधूनच सरपंचपदाची निवड होणार असल्यामुळे राजकीय गणिते महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामपंचायतींमधील महिला सरपंपदाची सोडत निघाल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूणच ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा एकदा निवडीच्या हालचालींना वेग येणार आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी दुसऱ्यांदा आणि सलग तिसऱ्यांना महिलांसाठीच पद आरक्षित झाले तेथील इच्छुकांनी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी वर्षा मिना आणि तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याने त्यांच्या तक्रारीही निकाली निघाल्या आहेत.
--इन्फो--
महिला राखीव ग्रामपंचायती प्रवर्गनिहाय -
अनु. जमाती : देवरगाव, इंदिरानगर, लाडची, नाईकवाडी, वाडगाव, महादेवपूर, वासाळी, गणेशगाव (त्र्यं), गणेशगाव (नाशिक),राजेवाडी, गंगाम्हाळुंगी, दहेगाव, जातेगाव, तळेगाव(अं), पिंपळद (ना),राजूरबहुला, लहवित, कोटमगाव
अनु. जाती : संसरी,बेलतगव्हाण,
--
ओबीसी : लाखलगाव, विंचूरगवळी, मोहगाव, रायगडनगर, कालवी
--
सर्वसाधारण : पळसे, विल्होळी, सामनगाव, ओढा, बेलगाव ढगा, जाखोरी, गौळाणे, लोहशिंगवे, दोनवाडे