चांदोरी : चांदोरी परिसरात गेल्या आॅगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे नुकसान झाले. त्यात काही छायाचित्रकारांचे फोटो स्टुडिओही पाण्याखाली गेले. शासकीय स्तरावर पंचनामे झाले परंतु मदत पोहोचली नाही. अशावेळी या नुकसानग्रस्त छायाचित्रकारांच्या मदतीला आॅल इंडिया फोटोग्राफर असोसिएशन धावून आली आणि प्रत्येकी साडेसात हजारांचा धनादेश देत मदतीचा हात दिला.आॅगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरात सायखेडासह चांदोरी, शिंगवे, चाटोरी येथील छायाचित्रकारांच्या फोटो स्टुडिओमध्येही पाणी घुसून मोठे नुकसान झाले. लाखो रुपये किंमतीचे कॅमेरे, संगणक तसेच छायाचित्रणविषयक साहित्य पाण्यात भिजले. शासनाने पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले परंतु, मदत कुणापर्यंतही पोहोचली नाही. संस्मरणीय घटनाघडामोडी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे छायाचित्रकार मदतीपासून उपेक्षितच राहिले. या छायाचित्रकारांनाही मदतीचा हात देण्यासाठी फोटोग्राफर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आॅल इंडिया फोटोग्राफर असोसिएशनकडे व्यथा मांडली आणि पाठपुरावा केला. सोबत निफाड तालुका छायाचित्रकार संघटनेनेही वेळोवेळी पाठपुरावा केला. आॅल इंडिया फोटोग्राफर असोसिएशनने हाकेला प्रतिसाद देत आपले सभासद नसतांनाही सहानुभूती व्यक्त करत या नुकसानग्रस्त छायाचित्रकारांना मदतीचा हात दिला. प्रत्येकी साडेसात हजारांचा धनादेश हेमंत जिरेमाळी, संजय भागवत, शरद जाधव, पोपट वाळुंज, दिपक बिडकर, रामेश्वर सानप, गणेश वाणी, संदीप पवार,राजेंद्र झोंटींग या पुरग्रस्त छायाचित्रकारांना प्रदान करण्यात आला. यावेळी नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, संस्थापक अध्यक्ष हिरामण सोनवणे , उपाध्यक्ष पंकज आहिरराव यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.यावेळी निफाड तालुका छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष भारत मोरे, सचिव विवेक कदम, विठ्ठल वरखेडे, नाना पवार सह पदाधिकारी व छायाचित्रकार उपस्थित होते.
पूरग्रस्त छायाचित्रकारांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 6:03 PM
सामाजिक पुढाकार : चांदोरीत नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप
ठळक मुद्देआॅगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरात सायखेडासह चांदोरी, शिंगवे, चाटोरी येथील छायाचित्रकारांच्या फोटो स्टुडिओमध्येही पाणी घुसून मोठे नुकसान