धनंजय रिसोडकर
नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, यासाठी अनेक डॉक्टर संबंधित रुग्णाला प्लाझ्मा देण्याची शिफारस करतात. मात्र, काहीवेळा रक्तपेढ्यांमध्येही प्लाझ्मा उपलब्ध नसतो. अशावेळी मग काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या सामाजिक संस्था आणि समाजमाध्यमांतील व्हॉट्सॲप ग्रुपवर एकत्र येऊन अशा बाधितांसाठी प्लाझ्मादानासाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे अनेक रुग्णांना प्लाझ्माची आवश्यकता भासत आहे. त्यांना ऐनवेळी ब्लड बँकेत प्लाझ्मा उपलब्ध न झाल्यास त्यांना हव्या त्या रक्तगटाचा प्लाझ्मा दान करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक पुढाकार घेऊ लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कुणी त्यासाठी प्लाझ्मा डोनर्सचे ग्रुप तयार करण्यास प्रारंभ केला आहे, तर काही सामाजिक संस्था त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्लाझ्माच्या दानासाठी मदतीचा हात पुढे करीत असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळू लागला आहे. प्लाझ्मादान करणारे स्वतःहून पुढे येत असल्याने अनेक गरजू रुग्णांना प्लाझ्मा मिळू लागला आहे. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा अन्य कोरोनाग्रस्ताला दिला, तर त्या व्यक्तीला कोरोनावर मात करण्यास मदत मिळते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनीदेखील प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
इन्फो
एका दात्याकडून दोघांना दिलासा
कोरोनामुक्त होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी झालेल्या नागरिकाच्या शरीरातून ४०० मिली ग्रॅम प्लाझ्मा उपलब्ध होतो. त्यातून एका रुग्णाला २०० मिली ग्रॅम याप्रमाणे दोन रुग्णांना कोरोनामुक्त होण्यास मदत होत आहे. त्यामुळे एका प्लाझ्मा दात्याच्या माध्यमातून त्याच रक्तगटाच्या दोन रुग्णांना एकप्रकारे जीवनदान मिळत आहे. प्लाझ्मामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असली तरी प्रकृती गंभीर होण्याआधीच म्हणजे पाचव्या किंवा सातव्या दिवशी प्लाझ्मा देणे आवश्यक आहे. योग्य रुग्णाला योग्य वेळी हे उपचार दिल्यास फायदा होत असल्याचा अनुभव त्यांनी नमूद केला.
इन्फो
महिलांसह युवकांकडून ७०० वर प्लाझ्मा संकलन
नाशिकमधील काही युवक आणि महिलांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या प्लाझ्मा फॉर नाशिक या ग्रुपकडून ७०० हून अधिक प्लाझ्मा पिशव्यांचे संकलन केले आहे. गत दोन आठवड्यांच्या काळात त्यांच्याकडे विचारणा होणाऱ्या रुग्णांसाठी त्यांना हव्या त्या रक्तगटाचा प्लाझ्मादाता उपलब्ध करून देण्यात या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. गरजूंनी ९८५०५ ५१००७ या क्रमांकावर संपर्क साधल्यास प्लाझ्मा उपलब्ध होऊ शकतो. या उपक्रमात सुचित्रा अहिरे, सोनाली पिंगळे, अंकिता अहिरे, अजिंक्य गिते, किरण जाधव, डॉ. प्रतीक देवरे, नंदन बोरस्ते यांच्यासह अन्य युवक-युवतींचे मोठे योगदान आहे.
इन्फो
बिझनेस असोसिएशनकडून २५० प्लाझ्मा
नाशिक बिझनेस असोसिएशनच्या माध्यमातून २५० हून अधिक रुग्णांना प्लाझ्माचा लाभ उपलब्ध करून दिला आहे. त्याशिवाय ब्लड बँकांना १०० हून अधिक प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून दिले आहेत. गरजूंनी ९८२३७ ८६१०१ या क्रमांकावर संपर्क साधल्यास प्लाझ्मा उपलब्ध होऊ शकतो. या असोसिएशनच्या माध्यमातून उमेश शिंदे, तुषार श्रीवास्तव, संजय लोळगे, राजेंद्र कोतकर, विशाल देसले, अमित पवार, अमोल जोशी, अमित कोतकर यांनी हा पुढाकार घेतला आहे.