नाशिक : ‘आयमा’ निर्मित आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ आयोजित अक्षरबाग वाचनकट्टा चळवळीअंतर्गत रविवारी (दि.२२) ‘हॅनाची सुटकेस’ या कादंबरीचे अभिवाचन डिसूझा कॉलनी येथील प्रौढ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. ओवी हिने या कादंबरीचे वाचन केले. हळुवारपणे पण प्रभावीपणे झालेल्या या वाचनाने श्रोते दंग झाले होते. कॅरेन डिव्हाइन यांच्या कादंबरीचे माधुरी पुरंदरे यांनी भाषांतर केले असून, दिग्दर्शन जयेश आपटे यांनी केले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या छळ छावणीमध्ये मारल्या गेलेल्या हॅनाची ही कथा आहे. हॅनाची सुटकेस एका म्युझियममध्ये दिसते आणि त्यावरून कथेला सुरुवात होते. ही सुटकेस तपकिरी रंगाची असते. त्यात बºयापैकी साहित्य ठेवता येईल, असा तिचा आकार असतो. मोठ्या प्रवासासाठी ती वापरली गेली असेल, हे तिच्या आकारावरून स्पष्ट होते. १९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसºया महायुद्धात ज्यू लोकांचा अतोनात छळ झाला. त्यांना उपाशी डांबण्यात आले. त्यांच्यावर अतोनात अत्याचार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यात लहान मुलांची संख्या मोठी होती. हॅना हीदेखील त्यात असलेली मुलगी होती. युद्धजन्यस्थितीत तिची आणि तिच्या आईची ताटातूट होते. भाऊदेखील तिच्यापासून दुरावतो, अशी ही कथा आहे. एक तासाच्या या कथेचे वाचन ओवी हिने केले तर सुवर्णा क्षीरसागर हिने त्याला साजेशे पार्श्वसंगीत दिले. निर्मिती, संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे होते. ध्वनिसंकलन आदित्य रहाणे यांनी केले.
श्रोत्यांना भावली ‘हॅनाची सुटकेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:40 AM