नाशिक : केवळ भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून कुत्र्याचा जीव का घेतला याचा जाब विचारला म्हणून हरसूलच्या राजेवाडी शिवारातील सहादू अमृता टोपले (५५) यांना काठीने जबर मारहाण करून खून करणारे आरोपी रावजी आवजी टोपले (४९) व सुभाष देवराम टोपले (४१ ,रा़ राजेवाडी शिवार, हरसुल़ ता़ त्र्यंबकेश्वर) यांना जिल्हा न्यायाधीश यू़एम़नंदेश्वर यांनी बुधवारी (दि़३) जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ विशेष म्हणजे या खूनातील आरोपींपर्यंत पोहोचण्याचे काम ग्रामीण पोलीस दलातील ‘टायगर’ या श्वानाने केली होती़ सरकारी वकील दीपशिखा भिडे -भांड यांनी न्यायालयात खून खटल्यातील वैद्यकीय पुरावे, डीएनए अहवाल, श्वान विभागाने केलेला तपास व परिस्थितीजन्य पुरावे सादर केले होते़
६ मार्च २०१५ रोजी राजेवाडी शिवारातील दारुच्या झापावरून सहादू टोपले हे आपल्या राजा नावाच्या कुत्र्यासोबत घरी जात होते़ यावेळी आरोपी रावजी टोपले व सुभाष टोपले हे समोरून येत असताना त्यांच्यावर कुत्रा भुंकला तसेच चावा घेतल्याने त्यांनी कुत्र्यास मारून टाकले़ याबाबत सहादू टोपले यांनी या दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी काठीने डोक््यावर व तोंडावर जबर वार करून खून केला़ यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सहादू टोपले यांचा मृतदेह सावरदरा पाणर तलावाजवळ नेऊन ३५ किलोचा दगड बांधून पाण्यात फेकून दिले़ हरसूल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या खूनाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आऱबी़किर्तीकर यांनी केला होता़
ग्रामीण पोलिसांनी खुनाची उकल करण्यासाठी श्वान विभागाची मदत घेतली होती़ श्वान विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक व टायगर या श्वानाचे हँडलर एऩबी़बघे़ यांनी दारूच्या झापापासून गंध दिल्यानंतर ते दोन्ही आरोपींच्या घरी पोहोचून आरोपींवर भुंकले होते़ तसेच मयत टोपले यांचा मृतदेह नेत असताना पडलेले रक्त, बूट व दात हे पुरावेही टायगरने शोधून काढले होते़ त्यानंतर पाझर तलावातून सहादू टोपले यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता़ न्यायाधीश नंदेश्वर यांनी सरकारी वकीलांनी घेतलेले साक्षीदार व पुरावे ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा सुनावली़
न्यायालयातील खटल्यात आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संजय आहेर व पोलीस नाईक संतोष गोसावी यांनी सरकार पक्षाला मदत केली़